कापुस सोयाबीन मदतीसाठी ई पीक पाहणी अट रद्द!

Kapus soyabean anudan: महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अभियान सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी असलेली ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.

परळीत, कृषि उत्पन्न बाजार समिती येथे दिमाखदार सोहळ्यात पाचदिवसीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

यादीत नाव पहा

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणीतील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

 

पाच दिवसीय या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसांत विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. याठिकाणी धान्य महोत्सव, रानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषि अवजारांचा स्वतंत्र विभागदेखील याठिकाणी आहे. या पाचदिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

Home

Leave a Comment