परळीत, कृषि उत्पन्न बाजार समिती येथे दिमाखदार सोहळ्यात पाचदिवसीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यादीत नाव पहा
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणीतील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
पाच दिवसीय या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसांत विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. याठिकाणी धान्य महोत्सव, रानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषि अवजारांचा स्वतंत्र विभागदेखील याठिकाणी आहे. या पाचदिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.