Education Loan: मुलांच्या भविष्यासाठी शैक्षणिक लोन कोणतं ठरेल फायद्याचं? जाणून घ्या

मुंबई : शिक्षण दिवसेंदिवस महागडं होत चाललं आहे. मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए, फार्मसी सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.

अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून शैक्षणिक कर्ज अर्थात ‘एज्युकेशन लोन’ घेण्याचा विचार अनेक पालक करतात. तर, काही पालक वैयक्तिक कर्ज अर्थात ‘पर्सनल लोन’ घेण्यास प्राधान्य देतात. पण शिक्षणासाठी कुठलं कर्ज घेणं फायद्याचं ठरेल याचा तुम्ही कधी विचार केलाय? चला तर, हेच आज जाणून घेऊ.

‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय. पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तर ते कर्ज घेऊन घेतात. पालकांनी कुठलं कर्ज घ्यावं, हे कसं ठरवलं पाहिजे, ते जाणून घेऊ.

कर्जाची रक्कम महत्त्वाची –

शैक्षणिक कर्ज 50 हजार ते दीड कोटी रुपयांपर्यंत मिळू शकतं.

शैक्षणिक संस्थेचे रँकिंग, फी आणि वसतिगृह फी, पुस्तकांची किंमत, साहित्य, लॅपटॉपची किंमत यांसारख्या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चांची पडताळणी केल्यानंतरच बँक शैक्षणिक कर्ज मंजूर करते. तर, वैयक्तिक कर्जाची रक्कम ग्राहकाच्या कमाई आणि परतफेड क्षमतेच्या आधारावर ठरवली जाते. यामध्ये सिबिल (CIBIL) स्कोअर महत्त्वाचा ठरतो. बँक, वित्तीय संस्था जास्तीतजास्त 40 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देतात.

हे कर्ज कोणत्याही वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येतं.

कर्जाचा हप्ता कधी सुरू होतो?

शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्याच्या नावावर असतं. म्हणजे ते भरण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असते. त्यामुळे विद्यार्थ्याला कर्जाचा हप्ता हा अभ्यासक्रम सुरू असताना आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत भरावा लागत नाही.

याला ‘मोरेटोरियम पीरियड’ म्हणतात. म्हणजेच विद्यार्थ्याला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत नोकरी मिळते, असं बँकेनं गृहीत धरलं आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर ईएमआय सुरू होतो. या शिवाय, बँक मेडिकल इमर्जन्सी, बेरोजगारी आणि इनक्युबेशन पीरियडदरम्यान किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्टार्टअप सुरू केल्यास ‘मोरेटोरियम पीरियड’ वाढवू शकते.

तर, वैयक्तिक कर्जाची घेतल्यानंतर रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये हस्तांतरित होताच दुसऱ्या महिन्यापासून कर्जाचा हप्ता म्हणजेच ईएमआय सुरू होतो. त्यामुळे एखाद्या पालकाने त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी वैयक्तिक कर्ज घेतलं, तर संबंधित पालकाला कर्ज मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून ईएमआय भरावे लागतील.

👉हे पण वाचा : पीएम किसान च्या या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ यादीत तुमचे नाव पहा

शैक्षणिक कर्जावर मिळते टॅक्स माफी –

शैक्षणिक कर्जावर टॅक्स माफीचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80 ई अंतर्गत, विद्यार्थी कर्जाच्या परतफेडीच्या पहिल्या 8 वर्षांच्या व्याजावरील रकमेवर टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकतो.

वैयक्तिक कर्जावर मात्र कुठलीही टॅक्स सवलत मिळत नाही.

कर्जाची मुदत –

शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी जास्तीतजास्त 15 वर्षांची मुदत असते. दीर्घ मुदतीमुळे ईएमआय रक्कम कमी असते, त्यामुळे विद्यार्थी ती सहजपणे देऊ शकतात. तर, वैयक्तिक कर्जाची मुदत ही जास्तीतजास्त 7 वर्षांची असते.

कोणत्या कर्जाला किती व्याजदर?

वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत शैक्षणिक कर्जावर कमी व्याजदर असतो. सध्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर 8.50% ते 15% प्रतिवर्ष आहे. काही बँका मुलींना अतिरिक्त 0.5% सूट देतात. दुसरीकडे, वैयक्तिक कर्जाचे व्याज दर साधारणपणे 10.50% ते 20% प्रतिवर्ष आहेत. याचाच अर्थ, जर तुम्ही केवळ शिक्षणाशी संबंधित खर्चासाठी वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागेल.

जामिनदाराची आवश्यकता असते का?

देशात शिक्षणासाठी 4 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी जामिनदाराची गरज नाही. केवळ शैक्षणिक आधारावर ते मिळतं. 4 लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्ज हवं असल्यास पालक हे सह-अर्जदार असतात. त्यासाठी मालमत्ता, बँक ठेवी, म्युच्युअल फंड आणि विमा पॉलिसी सुरक्षा म्हणून जमा कराव्या लागतात.

तर वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत मार्जिन मनी नसते. येथे कोणत्याही जामिनदाराची आवश्यकता नसते.

कोणतं कर्ज घेणं चांगलं?

शैक्षणिक कर्जावर कमी व्याजदर, कर्ज परतफेडीची दीर्घ मुदत, मोरेटोरियम पीरियड आणि टॅक्स सवलत यासारखे फायदे मिळतात. पण, दुसरीकडे चार लाखांपेक्षा जास्त शैक्षणिक कर्ज घेताना हमीदार नसल्यामुळे किंवा गहाण ठेवण्यासाठी अपुरे तारण असल्यामुळे शैक्षणिक कर्ज मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करू शकता.

कारण वैयक्तिक कर्जात कर्जदाराला तारण किंवा मालमत्तेची कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नाही. हे कर्ज फारच कमी कागदपत्रांवर मिळतं. बँक वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअर आणि महिन्याचे उत्पन्न यावर अधिक लक्ष केंद्रित करते. या शिवाय, जर पालकांना कर्ज केवळ 3 ते 4 वर्षांसाठी हवं असेल, तर वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढला आहे. अशावेळी शिक्षणासाठी कर्ज घेण्याचं प्रमाण वाढत आहे. मात्र, कर्ज घेताना नेमकं कोणत्या प्रकारचे कर्ज घेणं फायद्याचं ठरेल, याचाही विचार करणे गरजेचे आहे.

👉Mudra Loan : मुद्रा कर्ज योजना व्यवसाय सुरु करण्यासाठी 50हजार ते 10लाख पर्यंत कर्ज प्रक्रिया

Leave a Comment